Saturday, December 17, 2005

सात्विक संताप

‘चीड’ ही साधी सोपी भावना जेंव्हा सभ्य लोकांच्या मनात जन्म घेते, तेंव्हा तिला जे बाळसेदार नाव प्राप्त होतं, त्याला म्हणतात ‘सात्विक संताप’. क्षुल्लक कारणामुळे जर एखाद्या सभ्य व्यक्तीचा अगदी चडफडाट झाला तर त्याला म्हणतात ‘सात्विक संताप’. लक्षात घ्या, एखादा राग ‘सात्विक संताप’ म्हणून qualify होण्यासाठी उपरोक्त ३ गोष्टी आवश्यक आहेत – कारण अगदी क्षुल्लक असलं पाहिजे, कर्त्याचा पार तिळपापड झाला पाहिजे आणि कर्ता हा अत्यंत सभ्य किंबहुना सात्विक असला पाहिजे.

सात्विक संताप येण्याचं कारण म्हणजे ‘नियमभंग’. सत्वगुणी व्यक्तीच्या तत्वांशी, मूल्यांशी खेळ झाला तर त्यांना जे काही होतं तो सात्विक संताप. आता मुळात सात्विक माणूसच तात्विक असू शकतो. सत्वगुणातून जन्मलेल्या तत्वांची पायमल्ली होऊन त्याचं रूपांतर जेंव्हा तमोगुणात होतं, तेंव्हा त्याला म्हणतात ‘सात्विक संताप’. बरं झाली तत्वांची मोडतोड, मग लढा ना त्याविरुद्ध, चिडून काय होणार आहे? पण ते होणे नाही... कारण, ९०% वेळा हा मनुष्य मध्यमवर्गीय असतो. चिडण्याव्यतिरिक्त अन्य काही करणं त्याला शक्य नसतं. पापभीरू वृत्तीचा, आपली व आपल्या कुटुंबाची खुशाली चिंतणारा मनुष्य कुणाचंही काहीही वाकडं करूच शकत नाही.

हा झाला सात्विक भाग. दुसरा मुद्दा आहे, कारण क्षुल्लक असण्याचा. ही काही उदाहरणं पाहूया...

‘अ’ आज चांगलाच आनंदात आहे. रविवार सकाळची ९ वाजताची वेळ आहे. नाटकाची तिकिटं काढायला निघाला आहे. काsssही घाई नाहीये. पहिल्याच चौकात signal चा दिवा लाल झाला आहे. ८० चा आकडा पाहून ‘अ’ इमाने इतबारे गाडी बंद करून थांबला आहे. ७८, ७६, ७५.....हा कर्कश्श आवाज कसला? ओह.... truck आहे. ‘अ’ हसत हसत लाल दिव्याकडे बोट दाखवतो आहे, अपेक्षा आहे की driver साहेब म्हणतील, “ओह मी पाहिलंच नाही, sorry हं”, आणि truck बंद करून थांबतील. पण उत्तर आलं “तुम्हाला थांबायचं तर थांबा की, आमची खोटी कशापायी करताय सकाळी सकाळी”. एक इरसाल शिवी आठवण्याचा प्रयत्न करीत ‘अ’ने गाडी बाजूला घेतली आहे... रस्त्यापलीकडच्या दुकानातला नोकर झाडू मारता मारता हसतो आहे. आत्ता ‘अ’चं जे काही झालं आहे, तो आहे सात्विक संताप.

‘ब’चं मराठीवर, शुद्ध मराठीवर आत्यंतिक प्रेम आहे. शेजारीच एक नवीन दुकान सुरु झालं आहे. काही पुस्तकं घ्यावीत आणि दुकानातलं collection कसं आहे हे पाहावं म्हणून ‘ब’चा मोर्चा दुकानाकडे वळला आहे. हे काय, दुकान बंद.... आणि पाटी काय लावली आहे म्हणे....
“सुचणा”
“ ऊदया दीणांक साहा डीसेंबर रोजि दुकाण बंद राहिल... क्शमस्व.... “
अशी ‘सुद्द’ मराठीतली पाटी वाचून ‘ब’ला जे काही झालं आहे, तो आहे सात्विक संताप.

‘क’ हा अतिशय कलाप्रिय आणि शिस्तप्रिय माणूस. शाळा कॉलेजात याने अनेक कार्यक्रम यशस्वीपणे बसवले आहेत. २ वर्ष नुसती खर्डेघाशी केल्यानंतर जुन्या मित्रांना जमवून १ कार्यक्रम बसवायचं ठरलं आहे. ठरल्याप्रमाणे भल्या पहाटे उठून रविवारी सकाळी ८ वाजता हा ठरल्या ठिकाणी हजर आहे... पण अजून कोणाचाच पत्ता नाही. ८-१५, ८-३०, ८-४५..... शेवटी ९ वाजता सगळे आले आहेत, पण सगळ्यांना भूक लागली असल्याने break fast साठी वैशाली कडे मोर्चा वळला आहे. यांना कशाचा seriousness कसा नाही असा विचार करत ‘क’ सात्विक संतापाचा धनी झाला आहे.
एकूण तुमच्या लक्षात आलं असेल की या सगळ्यांच्या अपेक्षा काही revolutionary नाहीत, साध्या आहेत. वेळ पाळली पाहिजे, शुद्ध लिहिलं/बोललं पाहिजे, traffic चे नियम पाळले पाहिजेत इ. इ. तसं पाहिलं तर यांचे मुद्दे बरोबर आहेत, पण ते नाही पाळले गेले तर स्वतःला इतका त्रास करून घ्यायची काही गरजही नाहीये. तरीही यांना राग येतो आहे, नव्हे नव्हे सात्विक संताप येतो आहे.

धोक्याची सूचना – तुमच्या आसपासच्या कोणास जर सात्विक संताप आला असेल, तर कृपया त्यावर हसू नका. चेष्टा तर अजिबात करू नका, अन्यथा एक प्रवचन ऐकावे लागेल.

8 Comments:

Blogger Pawan said...

"चडफडण्या"वर लिहिलेला लेख वाचून आनंद वाटला. आता पुढच्या वेळेस चीड आल्यावर त्या "सात्विक संतापाची" खबर कशी घ्यायची याचे चिंतन करायला खाद्य मिळाले आहे! :-)

6:08 AM  
Blogger paamar said...

Good one ! So 'saatvik' santaap yava ka yeu naye ? IMO, it is to some extent associated with sensitivity. If there is no 'saatvik santaap' about things going wrong, at some point of time we will lose our sensitivity towards wrong things :)

8:42 PM  
Blogger Fleiger said...

he suddha saatvik santapachech udaharan na? :D

8:12 AM  
Blogger paamar said...

Hi ! Can you pls contact me at paamar at gmail dot com ?

11:39 PM  
Blogger hemant_surat said...

सात्विक संताप ह्याला आम्ही गमतीने "वांझोट्याचा तळतळाट" असेही म्हणतो. कारण त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. फ़क्त आपलेच ब्लड प्रेशर वाढते. पण तो केल्याशिवाय, किंबहुना, आपल्या कोणालातरी ऎकवल्याशिवाय चैन पण पडत नाही. तुमचे अनुभव ही आमची पण प्रचीती आहे. तेव्हा जरूर लिहीत चला. आम्हाला आवडतय.
हेमंत पाटील - सुरत

7:47 PM  
Blogger Parag said...

Chan ahe article..! Kharach dainandden jivanat satweek santapache anek prasanga yetat... Ani apan mhantlya pramane kharach kahich karata yet nahi ani nustach apala BP vadhata...Satweek santapache ajun ek udaharn...( je mazya babtit anekda ghadlay.. :) Railway station, kinwa movie tickets cha 2/3 windows astat...Apan jya line madhe ubha rahato, nemka tithlach manus bhayankat slow asato..ani apali sodun bakicha line bharabhar pudhe sarktat...Apan line soduhi shakat nahi ani tya mansavar ordun tyala sangu shakat nahi ki baba kam jara fast kar.. :)

9:30 AM  
Anonymous Anonymous said...

kharach chhan!!!
khoop diwasani chakka puneri marathit puneri santap ani tohi satwik..

10:07 PM  
Blogger Abhijit Galgalikar said...

छान आहे लेख. तुझा 'सात्विक' संताप उत्तम प्रकारे व्यक्त केला आहेस.

12:42 AM  

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home