Wednesday, January 27, 2021

फुलासारखे व्यक्तिमत्त्व

हल्ली ‘तुम्ही कशासारखे आहात?’ हे शोधणार्या फार बुवा साईटी झाल्यात. तुम्ही chocolate icecream आहात की butterscotch? तुम्ही पूर्वजन्मीच्या Fearless Nadira आहात की गार्गी, मैत्रेयी? तुम्ही पाणी आहात की आग? असंच परवा एका मैत्रिणीनं तिचं फूल-स्वरूप (बरंय मराठीमधे लिहिलंय, नाहीतर fool swaroop असं लिहावं लागलं असतं, असो) शेयर केलं होतं. ती म्हणे गुलाबासारखी होती. 

मी म्हटलं आपणही करावी का ही टेस्ट? जाई, सायली, जास्वंद वगैरे आलं तर ठीक आहे, पण उगीच कण्हेरी, कर्दळ असं काही आलं तर छान नाही वाटणार ना ते पोस्ट करायला.


पण काय रिझल्ट आला तर छान वाटेल मला? प्रत्येक फुलाला स्वत:चं असं एक व्यक्तिमत्व असतं का? त्यावर ते फूल श्रेष्ठ, कनिष्ठ ठरतं का?


जाई, जुई, सायली या सुंदर, नाजूक, सुगंधी नवयौवना. सळसळता उत्साह आणि चैतन्याने भारलेल्या. बकुळ म्हणजे जणू एखाद्या लहानशा गावातील अल्लड परकरी पोर. तिच्या निरागसतेतच तिचं सौंदर्य.


मोगरा, गुलाब आणि चाफा यांचं काम मात्र शाही. हे शब्दच मुळी पुल्लिंगी, दमदार. देवाला वाहिल्यावर दगडाच्या मूर्तीला देवत्व देण्याची शक्ती आहे यांच्यात. आणि तितक्याच ताकदीने दोन प्रेमी जिवांना एकरूप करण्याची कला देखील आहे त्यांच्या अंगी. अबोला सोडवण्यासाठी कितीजणांनी आपल्या प्रेयसीला मोगर्याचे गजरे, चाफ्याच्या वेण्या अन् गुलाबाचे गुच्छ दिले असतील, आणि प्रियतमाचा रुसवा मोडण्यासाठी किती जणींना आपल्या शृंगारात यांनी मदत केली असेल, हे न मोजणेच बरे. यांची शान काही औरच.


या रथी, महारथींच्या इतकीच वेडं करायची ताकद असलेली रातराणी मात्र मला गणिकेसारखी वाटते - उमराव जानसारखी. इतकी सुंदर, धुंद सुगंधाने ओथंबलेली, पण तिला ना कधी देवपूजेचा मान, ना कुठल्या रमणीच्या केसात माळलं जाण्याची शान. इतकंच काय, बहुतेक वेळा तिला घरच्या बागेत देखील स्थान नसतं. अत्यंत अनपेक्षित पणे रस्त्यात कुठेतरी अचानक हिचा सुगंध येतो आणि पाय त्या जागी जखडतात. अगदी तसंच खिळून राहणं, उमराव जानचे सूर कानावर पडल्यावर होतं, तसं.


कमळ मात्र धीरगंभीर, नि:पक्ष, स्थितप्रज्ञ. ‘ते कमळ’. लक्ष्मी, गणपती आणि सरस्वतीच काय त्या कमळाच्या वाटेला जाऊ जाणे. जास्वंद तर इतकी गंभीर की गणपती सोडता इतर कोणासही भीक घालत नाही. 


बाकी गोकर्ण, सदाफुली, कण्हेरी, तगर, बिजली, शेवंती ही सगळी मध्यमवर्गीय मंडळी. रंग सुंदर, पण सुगंधहीन, low maintenance. माझा नंबर बहुधा यांच्या मधेच लागावा. वाटलंच होतं मला. बघा असं होतं गरज नसलेली प्रत्येक गोष्ट गरजेपेक्षा जास्त analyze केली की, जाऊ दे झालं. 

Monday, July 31, 2006

कुणीतरी असलं पाहिजे...

कुणीतरी असलं पाहिजे...

कुणीतरी असलं पाहिजे...
संध्याकाळी घरी गेल्यावर
आपल्यासाठी दार उघडायला..
सकाळी घरातून बाहेर पडताना
“लवकर ये” असं सांगायला...

मीटिंग मधून बाहेर आल्यावर
“back” असा मेसेज टाकायला...
“कंटाळा आलाय” हे कंटाळवाणं वाक्य
कंटाळा येईपर्यंत सांगायला...

इच्छित स्थळी पोचल्यावर
“सुखरूप पोचले” चा फोन करायला...
ट्रेक साठी जाताना “फार भिजू नकोस”
असं बजावायला...

उशीर होत असेल, तर
“जेवून घ्या” असं सांगायला...
कितीही वेळा सांगितलं तरीही
आपल्यासाठी जेवायचं थांबायला...

घरी आल्यावर आज काल झालं
ते सगळं सगळं सांगायला...
कटकटींचं मळभ हटवून
मन स्वच्छ करायला

Friday, March 17, 2006

Insecurity

काल “The Matrix” पाहण्यात आला. हे अशा प्रकारचे सिनेमे पाहिले की राहून राहून मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं. Hollywood मधल्या या अमेरिकन लोकांना सारखं असं का वाटत असतं की कोणीतरी त्यांच्यावर हल्ला करणार आहे? हल्ला करणारी वस्तू (हो वस्तूच म्हणलं पाहिजे) कधी परकी माणसं, कधी परग्रहवासी तर कधी मानवनिर्मित यंत्रं असतात. आणि मग कोणी हीरो महत्कष्टाने, पराक्रमाने पृथ्वीला (हो, प्रश्न सरळ पृथ्वीच्या किंवा अखिल मानव जातीच्याच अस्तित्वाचा असतो.) यातून वाचवतो. हे सिनेमे पाहून कुणाला वाटावं की विश्वाचा सगळा भार यांच्याच खांद्यांवर आहे.
ही झाली गोष्ट सिनेमाची. प्रत्यक्ष आयुष्यातही त्यांची धारणा अशीच आहे असं वाटण्याजोगी परिस्थिती आहे. त्याशिवाय का ते इराक, इराण, अफगाणिस्तान बेचिराख करत सुटले आहेत? याच्या मुळाशी खरंतर काय आहे? खरंच का हे देश एवढे घातक आहेत? अण्वस्त्र त्यांनी बाळगली तर ती त्यांच्या संरक्षणासाठी आणि बाकी कोणी बाळगली तर ती जगात घातपात करण्यासाठी असं वाटण्याचं कारण काय? यामागे नक्की काय आहे? जग आपल्या काबूत ठेवायची महत्वाकांक्षा, खरंच जाणवलेला धोका? की असुरक्षिततेची प्रचंड भावना आणि ती लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न?

Saturday, December 17, 2005

सात्विक संताप

‘चीड’ ही साधी सोपी भावना जेंव्हा सभ्य लोकांच्या मनात जन्म घेते, तेंव्हा तिला जे बाळसेदार नाव प्राप्त होतं, त्याला म्हणतात ‘सात्विक संताप’. क्षुल्लक कारणामुळे जर एखाद्या सभ्य व्यक्तीचा अगदी चडफडाट झाला तर त्याला म्हणतात ‘सात्विक संताप’. लक्षात घ्या, एखादा राग ‘सात्विक संताप’ म्हणून qualify होण्यासाठी उपरोक्त ३ गोष्टी आवश्यक आहेत – कारण अगदी क्षुल्लक असलं पाहिजे, कर्त्याचा पार तिळपापड झाला पाहिजे आणि कर्ता हा अत्यंत सभ्य किंबहुना सात्विक असला पाहिजे.

सात्विक संताप येण्याचं कारण म्हणजे ‘नियमभंग’. सत्वगुणी व्यक्तीच्या तत्वांशी, मूल्यांशी खेळ झाला तर त्यांना जे काही होतं तो सात्विक संताप. आता मुळात सात्विक माणूसच तात्विक असू शकतो. सत्वगुणातून जन्मलेल्या तत्वांची पायमल्ली होऊन त्याचं रूपांतर जेंव्हा तमोगुणात होतं, तेंव्हा त्याला म्हणतात ‘सात्विक संताप’. बरं झाली तत्वांची मोडतोड, मग लढा ना त्याविरुद्ध, चिडून काय होणार आहे? पण ते होणे नाही... कारण, ९०% वेळा हा मनुष्य मध्यमवर्गीय असतो. चिडण्याव्यतिरिक्त अन्य काही करणं त्याला शक्य नसतं. पापभीरू वृत्तीचा, आपली व आपल्या कुटुंबाची खुशाली चिंतणारा मनुष्य कुणाचंही काहीही वाकडं करूच शकत नाही.

हा झाला सात्विक भाग. दुसरा मुद्दा आहे, कारण क्षुल्लक असण्याचा. ही काही उदाहरणं पाहूया...

‘अ’ आज चांगलाच आनंदात आहे. रविवार सकाळची ९ वाजताची वेळ आहे. नाटकाची तिकिटं काढायला निघाला आहे. काsssही घाई नाहीये. पहिल्याच चौकात signal चा दिवा लाल झाला आहे. ८० चा आकडा पाहून ‘अ’ इमाने इतबारे गाडी बंद करून थांबला आहे. ७८, ७६, ७५.....हा कर्कश्श आवाज कसला? ओह.... truck आहे. ‘अ’ हसत हसत लाल दिव्याकडे बोट दाखवतो आहे, अपेक्षा आहे की driver साहेब म्हणतील, “ओह मी पाहिलंच नाही, sorry हं”, आणि truck बंद करून थांबतील. पण उत्तर आलं “तुम्हाला थांबायचं तर थांबा की, आमची खोटी कशापायी करताय सकाळी सकाळी”. एक इरसाल शिवी आठवण्याचा प्रयत्न करीत ‘अ’ने गाडी बाजूला घेतली आहे... रस्त्यापलीकडच्या दुकानातला नोकर झाडू मारता मारता हसतो आहे. आत्ता ‘अ’चं जे काही झालं आहे, तो आहे सात्विक संताप.

‘ब’चं मराठीवर, शुद्ध मराठीवर आत्यंतिक प्रेम आहे. शेजारीच एक नवीन दुकान सुरु झालं आहे. काही पुस्तकं घ्यावीत आणि दुकानातलं collection कसं आहे हे पाहावं म्हणून ‘ब’चा मोर्चा दुकानाकडे वळला आहे. हे काय, दुकान बंद.... आणि पाटी काय लावली आहे म्हणे....
“सुचणा”
“ ऊदया दीणांक साहा डीसेंबर रोजि दुकाण बंद राहिल... क्शमस्व.... “
अशी ‘सुद्द’ मराठीतली पाटी वाचून ‘ब’ला जे काही झालं आहे, तो आहे सात्विक संताप.

‘क’ हा अतिशय कलाप्रिय आणि शिस्तप्रिय माणूस. शाळा कॉलेजात याने अनेक कार्यक्रम यशस्वीपणे बसवले आहेत. २ वर्ष नुसती खर्डेघाशी केल्यानंतर जुन्या मित्रांना जमवून १ कार्यक्रम बसवायचं ठरलं आहे. ठरल्याप्रमाणे भल्या पहाटे उठून रविवारी सकाळी ८ वाजता हा ठरल्या ठिकाणी हजर आहे... पण अजून कोणाचाच पत्ता नाही. ८-१५, ८-३०, ८-४५..... शेवटी ९ वाजता सगळे आले आहेत, पण सगळ्यांना भूक लागली असल्याने break fast साठी वैशाली कडे मोर्चा वळला आहे. यांना कशाचा seriousness कसा नाही असा विचार करत ‘क’ सात्विक संतापाचा धनी झाला आहे.
एकूण तुमच्या लक्षात आलं असेल की या सगळ्यांच्या अपेक्षा काही revolutionary नाहीत, साध्या आहेत. वेळ पाळली पाहिजे, शुद्ध लिहिलं/बोललं पाहिजे, traffic चे नियम पाळले पाहिजेत इ. इ. तसं पाहिलं तर यांचे मुद्दे बरोबर आहेत, पण ते नाही पाळले गेले तर स्वतःला इतका त्रास करून घ्यायची काही गरजही नाहीये. तरीही यांना राग येतो आहे, नव्हे नव्हे सात्विक संताप येतो आहे.

धोक्याची सूचना – तुमच्या आसपासच्या कोणास जर सात्विक संताप आला असेल, तर कृपया त्यावर हसू नका. चेष्टा तर अजिबात करू नका, अन्यथा एक प्रवचन ऐकावे लागेल.

Friday, December 02, 2005

पुनरुक्ती

“अगं आई, परवा केतकी भेटली होती....” ... माझं वाक्य मध्येच तोडत आईने बोटांनी ४ आकडा दाखवला. आणि म्हणाली “चौथ्यांदा सांगते आहेस”. मी जराशी हिरमुसले. काय बिघडलं असतं आणखी एकदा ऐकलं असतं तर? पण ही बोटांनी खूण करण्यची प्रथा मीच पाडली असल्याने गप्प बसले. पण मी सांगत होते कारण मला खूप सांगावसं वाटत होतं म्हणून. केतकी अचानक भेटल्यामुळे मला इतका आनंद झाला होता की गेले ३ दिवस मी आमच्या शाळेतल्या आठवणींमधून बाहेर येऊच शकले नव्हते. आणि तो आनंद मला वारंवार व्यक्त करायचा होता.

असं काय बघताय? मी काही एकटी नाही जगात जी तीच तीच गोष्ट परत परत सांगते. खूप जणांना ही सवय असते. वेगवेगळ्या कारणांनी लोक गोष्टी परत परत सांगत राहतात. अनेकदा या पुनरुक्तीची सुरुवात “मी सांगितलं का गं तुला?” किंवा “तुला सांगायचंच राहिलं बघ” या नांदीने होते. यापुढे बहुधा काहीतरी बातमी असते. “अमुकला तमक्या college मध्ये admission मिळाली”, “तमुकनी job change केला”, “ढमक्याचं लग्नं ठरलं” वगैरे वगैरे. यापुढे काही वेळ अमुक, तमुक किंवा ढमुक या विषयावर चर्चा अपेक्षित असते. श्रोता पहिल्यांदा ऐकताना “अरे वा”, “आयला!”, “हो का?” अशा reactions देतो. रंगतदार चर्चाही होते. परत तीच बातमी जेंव्हा सांगण्यात येते, तेंव्हा फक्त “हं” येतो. पुढच्या वेळी “हो सांगितलंस तू मला” अशी warning दिली जाते. यानंतर मात्र “किती वेळा सांगशील तेच तेच” अशी बोळवण होते.

या प्रकाराचं १ अतिशय irritating रूप म्हणजे “सूचना”. आपण कुठे trek ला, किंवा interview ला जाणार असलो, की प्रत्येक सूचना हजार वेळा ऐकावी लागते. “धांदरटपणा करू नकोस”, “फार पुढे जाऊ नका” इ. इ. चा भडिमार चालू असतो. बर चुकून काही चुकलंच तर “हजार वेळा सांगून झालं, पण ऐकतंय कोण?” हेही ऐकावं लागतं. कधी आपल्याला एखादं काम सांगितलं जातं. ते आपण विसरणार याची खात्रीच असते घरच्यांना. मग “नाही, विसरशील परत... ” असं म्हणत अनेकदा त्याची आठवण करून दिली जाते. यामध्ये बहुधा जाता-येता एखादं बिल भरणे, कोणाचं काही सामान कुठेतरी पोचवणे किंवा आणणे, कपडे इस्त्रीला देणे आदि गोष्टी येतात. हे एका limit च्या पुढे गेलं, की आपण खरोखरच ते काम करणं विसरून जातो.

वयस्कर व्यक्तींना आपल्या भूतकाळात रमत, आठवणींमध्ये कोरलेले प्रसंग सांगायची खूप सवय असते. याबाबतीत मला चिपळूकर सरांची आठवण येते. कधीही त्यांना भेटायला गेलं, की त्यांच्या तरूणपणातला हा किस्सा ऐकावाच लागतो. “काय सांगू तुला, मी आमच्या Fergusson च्या कबड्डी team चा कॅप्टन होतो. आम्ही एक tournament जिंकली होती. एवढा विजेत्या team चा कॅप्टन होतो, पण आमच्या college मधली एक मुलगी माझं अभिनंदन करायला आली तेंव्हा जाम घाबरलो होतो. तिनं नुसतं अभिनंदन नाही केलं, तर shakehand करायला हात पुढे केला. माझा हात काय थरथरत होता म्हणून सांगू..... नाहीतर ही आजकालची पोरं.... गळ्यात गळे काय घालतात, पापे काय घेतात...” यानंतर मग class मधल्या एखाद्या मुलानी कसं प्रेमप्रकरण केलं, अभ्यासाकडे कसं दुर्लक्ष केलं आणि मग सरांनी त्याला कसं वठणीवर आणलं, याची कथा असते.

अर्थात काहीसा हा प्रकार आपणही करतो. Engineering च्या submission ला घातलेले घोळ, मारलेल्या nights, केलेल्या copies हा विषय अनेकदा निघतो. आपण किती इरसाल आहोत हे समोरच्याला पटवून देत आपण तेच किस्से घोळवत राहतो. पुरुषोत्तम, फिरोदिया करणारी मंडळी तालमीच्या वेळच्या आठवणी आळवत राहतात. तो आनंद काही आगळाच असतो.....
एकूण माझ्या लक्षात येतंय की माझा मुद्दा मांडता मांडता मी ही तेच तेच परत परत सांगते आहे. तेंव्हा आता आवरतं घ्यावं हे बरं.

Tuesday, October 25, 2005

हुतात्मा

मराठी भाषेच्या बदलत्या काळाबरोबर गेल्या शतकापासून चालू असलेल्या युद्धात बळी गेलेल्या, हुतात्मा झालेल्या ‘शब्दांना’ माझे शतशः प्रणाम. काळाबरोबर नष्ट झालेल्या अनेक वस्तू, रूढींबरोबर त्यांची बिरुदं म्हणून मिरवणारे शब्दही अक्षरशः नामशेष झाले आहेत. त्यांचा उल्लेख आढळतो तो फक्त ऐंशी नव्वदीच्या घरातल्या आजी-आजोबांच्या तोंडीच.या ‘blog’ चा हेतू हाच की या २१ व्या शतकात त्याची कुठेतरी नोंद असावी.

काळ बदलला, माणसं बदलली, त्याची घरंही बदलली आणि अनेक शब्द बेघर झाले. ६४ खणी घरात राहिलेले लोक BHK चे मध्ये गेले आणि ‘खण’ कुठेतरी हरवले. ४ दारांसमोरच्या जागेत ‘अंगणाचा’ जीव गुदमरला. सिमेंटच्या फरशीवर ‘सडा’ पडेना झाला. माजघर, कोनाडे, खुंट्या, परसदार, वळचण, ओसरी... सगळं नाहीसं झालं.

नवीन नवीन सोयी झाल्या. चितळे पिशवीतनं दूध पोचतं करायला लागले आणि ‘चरव्या’ गेल्या. Mixer, grinders नी जाती, पाटे, वरवंटे यांना वाटेला लावलं. Electricity आल्यापासून दिवे ‘मालवायचे’ सोडून बंद व्हायला लागले.

हे काही शब्द संपले कारण त्यांची कारणंच संपली, पण काही काही शब्द तर replace झाले. आजकाल आम्हाला ‘पडसं’ नाही होत, ‘सर्दी’ होते. आम्ही ‘फाटक’ उघडं ठेवत नाही, ‘गेट’ बंद करतो. ‘तांबडं’ फुटत नाही: की ‘झुंजूमुंजू’ होत नाही, ‘दिन हुआ begin’ होतो. Flexi timing च्या जमान्यात ‘संध्याकाळ’ जिथे मिळत नाही तिथे ‘दिवेलागणी’ कुठली व्हायला... लहान मुलं आईच्या किंवा आजीच्या मांडीवर ‘निजत’ नाहीत, ती आपल्या स्वतंत्र खोल्यामध्ये ‘झोपतात’. ‘पातळाची’ आता ‘साडी’ झाली आहे आणि jeans सारखी तीही आजकाल ‘घालतात’, ती नेसत नाही कोणी. जी गोष्ट साडीची तीच फुलांची... आजी फुलं ‘माळायची’, नंतरच्या पिढीनं ती ‘घातली’….हल्ली तर त्याचीही लाज वाटायला लागली आहे. मुलींच्या कपाळाला पूर्वी ‘कुंकू’ असायचं, त्याला ‘टिकली’नं हरवलं.. पुढच्या पिढीत तर बहुधा तिलाही मान टाकावी लागणार. आजकाल पायात ‘वहाणा’ नसतात. Shoes, sandles किंवा floaters असतात. एखाद्या जुनाट व्यक्तीच्या पायात फार तर ‘चप्पल’ आढळते... तिला ‘पादत्राण’ अशी पदवी देवळात तेवढी मिळते...... तसे फारसे नाहीत पण थोडेफार ‘पक्षी’ दिसतात आजूबाजूला.. त्यांना ‘पाखरं’ म्हणून कोणी गोंजारत मात्र नाही.
जिथे आपण आज देश सोडतो आहे, रूढी सोडतो आहे, तिथे हे काही शब्द सुटले तर कुणाला काय फरक पडणार आहे... तरी पण राहून राहून वाटतं.... ज्या दिवशी जगातल्या शेवटच्या ‘आई’ची ‘मम्मी’ होईल, तो दिवस मायमराठीच्या सपशेल पराजयाचा असेल.

Thursday, October 13, 2005

इन्फ्लुएन्झा (INFLUENZA)

इन्फ्लुएन्झा नावाचा एक आजार आहे म्हणे. यात नक्की काय होतं मला माहिती नाही. माझी समजूत म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या किंवा एखाद्या घटनेच्या influence खाली येऊन जेंव्हा कोणी झपाटल्यासारखा वागायला लागतो, तेंव्हा त्याला इन्फ्लुएन्झा झालेला असतो. हसू नका, असे लोक खरंच आहेत. उदाहरणच घ्यायचं झालं तर अस्मादिकांचच घ्या.
आशाच्या गाण्यातली एखादी आपल्याला न जमणारी हरकत ऐकली, ( हे वाक्य “आशाच्या गाण्यातल्या हरकती” असं वाचलं तरी चालेल) की अचानक मला रोज रियाज करायची हुक्की येते. त्यानंतरचे २-४ दिवस रोज सकाळी ६ चा गजर लावला जातो. रियाज केला जात नाही ही गोष्ट निराळी, पण करायची इच्छा मात्र तीव्र असते. झाकिर हुसेन चा तबला ऐकला की घरातली सगळी tables वाजायला लागतात. भारतानी एखादा उपग्रह वगैरे आकाशात सोडला, की आपणही scientist व्हायला हवं होतं असं वाटायला लागतं. “नाहीतरी बारावीत physics आणि maths मध्ये पैकी च्या पैकी marks मिळाले होते” वगैरे विचारही पिंगा घालायला लागतात. त्यानंतरच्या २-४ आठवड्यांमध्ये पुरवणीत आलेल्या सगळ्या scientific लेखांचं मनापासून वाचन होतं.
अर्थात influenza ला बळी पडायला राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय ख्यातीचेच जिवाणू (किंवा विषाणू) लागतात असं काही नाही. कुलकर्ण्यांचा गिरीश २४ तासात ११ वेळा सिंहगड चढून आला की मी offices चे ३ मजले lift न वापरता चढून जाते. Paper मध्ये स्वदेशीच्या प्रसाराबद्दल एखादं article आलं की घरातून शक्य तितक्या विदेशी वस्तूंची हकालपट्टी होते. Colgate ची जागा मिसवाक घेते, Lux च्या जागी चंद्रिका विराजमान होते. आलेल्या पाहुण्यांना coca cola नाही तर कोकम सरबत दिलं जातं.
एखाद्या महिन्यात काही ‘शे’ रुपये कुठे गेले याचा पत्ता लागत नाही; मग नवीन डायरी आणून रोजच्या रोज हिशोब लिहायला सुरुवात होते.त्यात मग १९३ रुपये – १९१ पेट्रोल + २ हवा किंवा ३ रुपये देवासाठी फुलपुडी अशी चिल्लर नोंदही ठेवली जाते.
अहो मी हे blog वगैरे लिहायला लागले ना त्यालाही माझा influenza कारणीभूत आहे. आमच्या काही सुविद्य मित्र-मैत्रिणींचे blogs पाहून (वाचून) आमच्याही हाताला जरा खाज सुटली.
Influenza हा काही मला एकटीलाच होतो असं नाही बरंका. त्याची साथही पसरते. त्यासाठी बरेच वेळा ‘सिनेमा’ नावाचा virus कारणीभूत असतो. ‘दिल चाहता है’ hit झाल्यानंतर कितीतरी मुलांच्या ओठाखाली छोटीशी दाढी आली होती. तो ‘एक दूजे के लिये’ पाहून अनेक युगुलांनी आत्महत्या केली होती म्हणे.काही हुशार channel वाले लोकांच्या या वेडाचा आपल्या channel च्या प्रसिद्धीसाठी बरोबर वापर करतात... म्हणे ‘दीवाना बनादे...’
हा influenza किती काळ टिकणार हे रुग्णाच्या प्रकृतीवर अवलंबून असतं. आळशी माणसापुढे हा फार काळ तग धरत नाही. त्यांना येणारी कलेची, खेळाची किंवा इतर कशाचीही हुक्की ही फार अल्पजीवी असते. पण जर का एखाद्याला यानी ग्रासलं की त्याचा त्रास त्या व्यक्तीला कमी आणि इतरांना विशेषतः घरातल्यांना जास्त होतो.आजी आजोबा सकाळी सकाळी ‘नामदेव’ महाराजांचा योगा पाहतात आणि मग नातवाला ‘काय रे, नमस्कार वगैरे घालतोस की नाही’ अशी पृच्छा होते. गोड, तेलकट कमी खा असं बालाजी तांबे सांगतात आणि तळलेल्या पापडाच्या जागी भाजलेला पापड येतो. जेवताना TV पाहू नये असं आणखी कुठेतरी छापून येतं आणि त्या ‘सहज हवन होते’ मध्ये बरोबर आपल्या आवडत्या program ची आहुती पडते.
सारखं आजारी पडणाय्रा माणसाची म्हणे प्रतिकारशक्ती कमी असते. Influenza बद्दल पण काही लोक असं मत व्यक्त करतात. त्यांच्या मते ह्यांना स्वतःचं असं काही मतच नसतं. कोणी काहीही म्हणो, मला मात्र या influenza च्या आहारी जाणारी माणसं आवडतात. त्यांना आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्यायचा असतो, अगदी भरभरून. त्यांच्याकडे मत नसलं तरी संवेदनशीलता असते, गुणग्राहकता असते आणि असतं ‘जे जे उत्तम उदात्त उन्नत’ त्याबद्दलचं प्रेम.