Tuesday, October 25, 2005

हुतात्मा

मराठी भाषेच्या बदलत्या काळाबरोबर गेल्या शतकापासून चालू असलेल्या युद्धात बळी गेलेल्या, हुतात्मा झालेल्या ‘शब्दांना’ माझे शतशः प्रणाम. काळाबरोबर नष्ट झालेल्या अनेक वस्तू, रूढींबरोबर त्यांची बिरुदं म्हणून मिरवणारे शब्दही अक्षरशः नामशेष झाले आहेत. त्यांचा उल्लेख आढळतो तो फक्त ऐंशी नव्वदीच्या घरातल्या आजी-आजोबांच्या तोंडीच.या ‘blog’ चा हेतू हाच की या २१ व्या शतकात त्याची कुठेतरी नोंद असावी.

काळ बदलला, माणसं बदलली, त्याची घरंही बदलली आणि अनेक शब्द बेघर झाले. ६४ खणी घरात राहिलेले लोक BHK चे मध्ये गेले आणि ‘खण’ कुठेतरी हरवले. ४ दारांसमोरच्या जागेत ‘अंगणाचा’ जीव गुदमरला. सिमेंटच्या फरशीवर ‘सडा’ पडेना झाला. माजघर, कोनाडे, खुंट्या, परसदार, वळचण, ओसरी... सगळं नाहीसं झालं.

नवीन नवीन सोयी झाल्या. चितळे पिशवीतनं दूध पोचतं करायला लागले आणि ‘चरव्या’ गेल्या. Mixer, grinders नी जाती, पाटे, वरवंटे यांना वाटेला लावलं. Electricity आल्यापासून दिवे ‘मालवायचे’ सोडून बंद व्हायला लागले.

हे काही शब्द संपले कारण त्यांची कारणंच संपली, पण काही काही शब्द तर replace झाले. आजकाल आम्हाला ‘पडसं’ नाही होत, ‘सर्दी’ होते. आम्ही ‘फाटक’ उघडं ठेवत नाही, ‘गेट’ बंद करतो. ‘तांबडं’ फुटत नाही: की ‘झुंजूमुंजू’ होत नाही, ‘दिन हुआ begin’ होतो. Flexi timing च्या जमान्यात ‘संध्याकाळ’ जिथे मिळत नाही तिथे ‘दिवेलागणी’ कुठली व्हायला... लहान मुलं आईच्या किंवा आजीच्या मांडीवर ‘निजत’ नाहीत, ती आपल्या स्वतंत्र खोल्यामध्ये ‘झोपतात’. ‘पातळाची’ आता ‘साडी’ झाली आहे आणि jeans सारखी तीही आजकाल ‘घालतात’, ती नेसत नाही कोणी. जी गोष्ट साडीची तीच फुलांची... आजी फुलं ‘माळायची’, नंतरच्या पिढीनं ती ‘घातली’….हल्ली तर त्याचीही लाज वाटायला लागली आहे. मुलींच्या कपाळाला पूर्वी ‘कुंकू’ असायचं, त्याला ‘टिकली’नं हरवलं.. पुढच्या पिढीत तर बहुधा तिलाही मान टाकावी लागणार. आजकाल पायात ‘वहाणा’ नसतात. Shoes, sandles किंवा floaters असतात. एखाद्या जुनाट व्यक्तीच्या पायात फार तर ‘चप्पल’ आढळते... तिला ‘पादत्राण’ अशी पदवी देवळात तेवढी मिळते...... तसे फारसे नाहीत पण थोडेफार ‘पक्षी’ दिसतात आजूबाजूला.. त्यांना ‘पाखरं’ म्हणून कोणी गोंजारत मात्र नाही.
जिथे आपण आज देश सोडतो आहे, रूढी सोडतो आहे, तिथे हे काही शब्द सुटले तर कुणाला काय फरक पडणार आहे... तरी पण राहून राहून वाटतं.... ज्या दिवशी जगातल्या शेवटच्या ‘आई’ची ‘मम्मी’ होईल, तो दिवस मायमराठीच्या सपशेल पराजयाचा असेल.

Thursday, October 13, 2005

इन्फ्लुएन्झा (INFLUENZA)

इन्फ्लुएन्झा नावाचा एक आजार आहे म्हणे. यात नक्की काय होतं मला माहिती नाही. माझी समजूत म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या किंवा एखाद्या घटनेच्या influence खाली येऊन जेंव्हा कोणी झपाटल्यासारखा वागायला लागतो, तेंव्हा त्याला इन्फ्लुएन्झा झालेला असतो. हसू नका, असे लोक खरंच आहेत. उदाहरणच घ्यायचं झालं तर अस्मादिकांचच घ्या.
आशाच्या गाण्यातली एखादी आपल्याला न जमणारी हरकत ऐकली, ( हे वाक्य “आशाच्या गाण्यातल्या हरकती” असं वाचलं तरी चालेल) की अचानक मला रोज रियाज करायची हुक्की येते. त्यानंतरचे २-४ दिवस रोज सकाळी ६ चा गजर लावला जातो. रियाज केला जात नाही ही गोष्ट निराळी, पण करायची इच्छा मात्र तीव्र असते. झाकिर हुसेन चा तबला ऐकला की घरातली सगळी tables वाजायला लागतात. भारतानी एखादा उपग्रह वगैरे आकाशात सोडला, की आपणही scientist व्हायला हवं होतं असं वाटायला लागतं. “नाहीतरी बारावीत physics आणि maths मध्ये पैकी च्या पैकी marks मिळाले होते” वगैरे विचारही पिंगा घालायला लागतात. त्यानंतरच्या २-४ आठवड्यांमध्ये पुरवणीत आलेल्या सगळ्या scientific लेखांचं मनापासून वाचन होतं.
अर्थात influenza ला बळी पडायला राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय ख्यातीचेच जिवाणू (किंवा विषाणू) लागतात असं काही नाही. कुलकर्ण्यांचा गिरीश २४ तासात ११ वेळा सिंहगड चढून आला की मी offices चे ३ मजले lift न वापरता चढून जाते. Paper मध्ये स्वदेशीच्या प्रसाराबद्दल एखादं article आलं की घरातून शक्य तितक्या विदेशी वस्तूंची हकालपट्टी होते. Colgate ची जागा मिसवाक घेते, Lux च्या जागी चंद्रिका विराजमान होते. आलेल्या पाहुण्यांना coca cola नाही तर कोकम सरबत दिलं जातं.
एखाद्या महिन्यात काही ‘शे’ रुपये कुठे गेले याचा पत्ता लागत नाही; मग नवीन डायरी आणून रोजच्या रोज हिशोब लिहायला सुरुवात होते.त्यात मग १९३ रुपये – १९१ पेट्रोल + २ हवा किंवा ३ रुपये देवासाठी फुलपुडी अशी चिल्लर नोंदही ठेवली जाते.
अहो मी हे blog वगैरे लिहायला लागले ना त्यालाही माझा influenza कारणीभूत आहे. आमच्या काही सुविद्य मित्र-मैत्रिणींचे blogs पाहून (वाचून) आमच्याही हाताला जरा खाज सुटली.
Influenza हा काही मला एकटीलाच होतो असं नाही बरंका. त्याची साथही पसरते. त्यासाठी बरेच वेळा ‘सिनेमा’ नावाचा virus कारणीभूत असतो. ‘दिल चाहता है’ hit झाल्यानंतर कितीतरी मुलांच्या ओठाखाली छोटीशी दाढी आली होती. तो ‘एक दूजे के लिये’ पाहून अनेक युगुलांनी आत्महत्या केली होती म्हणे.काही हुशार channel वाले लोकांच्या या वेडाचा आपल्या channel च्या प्रसिद्धीसाठी बरोबर वापर करतात... म्हणे ‘दीवाना बनादे...’
हा influenza किती काळ टिकणार हे रुग्णाच्या प्रकृतीवर अवलंबून असतं. आळशी माणसापुढे हा फार काळ तग धरत नाही. त्यांना येणारी कलेची, खेळाची किंवा इतर कशाचीही हुक्की ही फार अल्पजीवी असते. पण जर का एखाद्याला यानी ग्रासलं की त्याचा त्रास त्या व्यक्तीला कमी आणि इतरांना विशेषतः घरातल्यांना जास्त होतो.आजी आजोबा सकाळी सकाळी ‘नामदेव’ महाराजांचा योगा पाहतात आणि मग नातवाला ‘काय रे, नमस्कार वगैरे घालतोस की नाही’ अशी पृच्छा होते. गोड, तेलकट कमी खा असं बालाजी तांबे सांगतात आणि तळलेल्या पापडाच्या जागी भाजलेला पापड येतो. जेवताना TV पाहू नये असं आणखी कुठेतरी छापून येतं आणि त्या ‘सहज हवन होते’ मध्ये बरोबर आपल्या आवडत्या program ची आहुती पडते.
सारखं आजारी पडणाय्रा माणसाची म्हणे प्रतिकारशक्ती कमी असते. Influenza बद्दल पण काही लोक असं मत व्यक्त करतात. त्यांच्या मते ह्यांना स्वतःचं असं काही मतच नसतं. कोणी काहीही म्हणो, मला मात्र या influenza च्या आहारी जाणारी माणसं आवडतात. त्यांना आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्यायचा असतो, अगदी भरभरून. त्यांच्याकडे मत नसलं तरी संवेदनशीलता असते, गुणग्राहकता असते आणि असतं ‘जे जे उत्तम उदात्त उन्नत’ त्याबद्दलचं प्रेम.

Saturday, October 01, 2005

आळशी माणसं...

“आळशी माणसं खूप हुशार असतात”. माझ्या या वाक्यावरची आईची प्रतिक्रिया ठरलेली आहे. “बरं बाई. तुमचा रेडा गाभणा. देतो, चांगलं दहा शेर दूध देतो.” आळशीपणा आणि हुशारी यांचं समीकरण जरी आईला पटलेलं नसलं तरी माझा यावर ठाम विश्वास आहे. माझ्या अनेक (आळशी) आप्तेष्टांचा माझ्या या मताला सुप्त पाठिंबा आहे हे मला ठाऊक आहे.
आळशी माणसं कधीही cotton चे किंवा रंग जाणारे कपडे विकत घेत नाहीत. Synthetic, मळखाऊ रंगाचे, machine wash/ बाई wash असेच कपडे घेतात. Wrinkle free कापड हा त्यांचा आवडता प्रकार. १-१ कपडा वेगळा धुणार कोण आणि cotton च्या कपड्यांना इस्त्री करणार कोण? एवढा सगळा विचार कपडे घेताना करावा लागतो आणि त्यासाठी चाणाक्ष बुद्धी लागते. रात्री झोपायच्या आधी दिवा बंद करायला उठायचं नसेल तर जवळ switch घेण्याची व्यवस्था घराचं wiring चालू असतानाच करून घ्यावी लागते. इतक्या बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवून करणं हे काही येरागबाळ्याचं काम नव्हे. दसरा आला की २ दिवस आधी गाडीचं servicing करून आणतील. म्हणजे नंतर नुसता हार घातला की काम झालं.
ही माणसं जेवतात अगदी सावकाश. यांचं जेवण होईपर्यंत ताटं उचलून झालेली असतात, उरलं सुरलं काढून ठेवलेलं असतं. अगदी पुसून घ्यायची वेळ आली तर ताट हातात घेऊन जेवत बसतात. नंतर यांना काही काम पडत नाही. हे लोक बहुधा भात खात नाहीत. भाताआधीचं जेवण होईपर्यंत इतका चेंगटपणा करतात की भाताची आणि झोपेची वेळ एकच येते. बरं भात खाल्ला नाही म्हणजे जाडी वाढत नाही आणि जाडी वाढली नाही म्हणजे व्यायाम करावा लागत नाही. चहा गाळल्यावर चोथा हातानी कधीही काढत नाहीत, त्यात पाणी घालून परत गाळतात आणि तेच dust bin वर आपटतात. देवालाही सोडत नाहीत. पूजेला बसताना पंचपात्रात पाणी घ्यायला नको म्हणून सरळ देवाला नळाखाली धरतात. चेष्टा नाही – प्रत्यक्ष पाहिलं आहे.
हे लोक public मध्ये मात्र प्रिय असतात. कधीही फारशी कटकट करत नाहीत. महिनोंमहिने यांचं पासबुक अपडेटेड नसतं. ते असावं असा त्यांचा हट्टही नसतो. बँकेत गेले आणि printer बंद असला तर सरळ बाहेर येतात, वाट बघत किंवा हुज्जत घालत बसत नाहीत. भाजी घेताना कोणती भाजी केवढ्याला वगैरे विचारत बसत नाहीत. सगळं घेऊन झालं की एकदमच किती झाले ते विचारतात. जणू काही त्यानीच आपल्याला गणित शिकवलं आहे अशा थाटात मान डोलवत पैसे देऊन रिकामे होतात. तो सुट्टे नाही म्हणाला तर उरलेले पैसे त्याला दान करतात. आपलं पाकिट उलथं पालथं करून सुट्टे शोधायच्या किंवा शेजारच्या दुकानातून वगैरे सुट्टे करून घ्यायच्या भानगडीत पडत नाहीत. त्यामुळे भाजीवाले, रिक्षावाले इ. लोक यांच्यावर सदैव खूष असतात. अशा लोकांमुळेच तर रिक्षा, taxi चालू आहेत. अहो चितळे, वैद्य यांचा धंदा चाललाच नसता जर सगळ्या बायकांनी मोदक, पुरणपोळ्या घरीच करायचं ठरवलं असतं तर.
आळशी माणसं काम बाकी छान करून घेतात. उंटावरून शेळ्या हाकायची सवयच असते ना. आपलं काम समोरच्याकडून कसं करून घ्यावं हे त्यांना बरोब्बर कळतं. आळशीपणा हा एक गुण “manager” म्हणवून घेणार्या प्राण्याकडे असणं आवश्यक आहे असं मला मनापासून वाटतं. अति उत्साही manager प्रत्येक न् प्रत्येक गोष्टीत नाक खुपसत बसतो. आपलं काम तर वाढवतोच पण हाताखालच्या लोकांना प्रचंड irritate करतो.
खरंतर माणूस आळशी आहे म्हणूनच तो उत्क्रांत झाला. दुनिया ज्यांची सारखी उदाहरणं देत असते, त्या मुंग्या, मधमाश्या किंवा कोळ्यांसारखं सारखं काम करत बसला असता, तर त्यांच्यासारखाच राहिला असता. माझ्यामते “गरज ही शोधाची जननी आहे” असं म्हणण्यापेक्षा “आळस ही शोधाची जननी आहे” असं म्हणलं पाहिजे. पायावर चालत राहिला असता तर वाहनं तयार झालीच नसती. सगळे निरोप प्रत्यक्ष जाऊन सांगायचे ठरवले असते तर post, telegram, e-mail या गोष्टी अस्तित्वात आल्याच नसत्या. Remote control, cordless phone यांची गरज किती होती हे बघा आणि त्यामागे आळस किती होता हे बघा. आणि आता तुम्हीच सांगा, आळशीपणा आणि हुशारी यांचं नातं आहे की नाही.