Wednesday, January 27, 2021

फुलासारखे व्यक्तिमत्त्व

हल्ली ‘तुम्ही कशासारखे आहात?’ हे शोधणार्या फार बुवा साईटी झाल्यात. तुम्ही chocolate icecream आहात की butterscotch? तुम्ही पूर्वजन्मीच्या Fearless Nadira आहात की गार्गी, मैत्रेयी? तुम्ही पाणी आहात की आग? असंच परवा एका मैत्रिणीनं तिचं फूल-स्वरूप (बरंय मराठीमधे लिहिलंय, नाहीतर fool swaroop असं लिहावं लागलं असतं, असो) शेयर केलं होतं. ती म्हणे गुलाबासारखी होती. 

मी म्हटलं आपणही करावी का ही टेस्ट? जाई, सायली, जास्वंद वगैरे आलं तर ठीक आहे, पण उगीच कण्हेरी, कर्दळ असं काही आलं तर छान नाही वाटणार ना ते पोस्ट करायला.


पण काय रिझल्ट आला तर छान वाटेल मला? प्रत्येक फुलाला स्वत:चं असं एक व्यक्तिमत्व असतं का? त्यावर ते फूल श्रेष्ठ, कनिष्ठ ठरतं का?


जाई, जुई, सायली या सुंदर, नाजूक, सुगंधी नवयौवना. सळसळता उत्साह आणि चैतन्याने भारलेल्या. बकुळ म्हणजे जणू एखाद्या लहानशा गावातील अल्लड परकरी पोर. तिच्या निरागसतेतच तिचं सौंदर्य.


मोगरा, गुलाब आणि चाफा यांचं काम मात्र शाही. हे शब्दच मुळी पुल्लिंगी, दमदार. देवाला वाहिल्यावर दगडाच्या मूर्तीला देवत्व देण्याची शक्ती आहे यांच्यात. आणि तितक्याच ताकदीने दोन प्रेमी जिवांना एकरूप करण्याची कला देखील आहे त्यांच्या अंगी. अबोला सोडवण्यासाठी कितीजणांनी आपल्या प्रेयसीला मोगर्याचे गजरे, चाफ्याच्या वेण्या अन् गुलाबाचे गुच्छ दिले असतील, आणि प्रियतमाचा रुसवा मोडण्यासाठी किती जणींना आपल्या शृंगारात यांनी मदत केली असेल, हे न मोजणेच बरे. यांची शान काही औरच.


या रथी, महारथींच्या इतकीच वेडं करायची ताकद असलेली रातराणी मात्र मला गणिकेसारखी वाटते - उमराव जानसारखी. इतकी सुंदर, धुंद सुगंधाने ओथंबलेली, पण तिला ना कधी देवपूजेचा मान, ना कुठल्या रमणीच्या केसात माळलं जाण्याची शान. इतकंच काय, बहुतेक वेळा तिला घरच्या बागेत देखील स्थान नसतं. अत्यंत अनपेक्षित पणे रस्त्यात कुठेतरी अचानक हिचा सुगंध येतो आणि पाय त्या जागी जखडतात. अगदी तसंच खिळून राहणं, उमराव जानचे सूर कानावर पडल्यावर होतं, तसं.


कमळ मात्र धीरगंभीर, नि:पक्ष, स्थितप्रज्ञ. ‘ते कमळ’. लक्ष्मी, गणपती आणि सरस्वतीच काय त्या कमळाच्या वाटेला जाऊ जाणे. जास्वंद तर इतकी गंभीर की गणपती सोडता इतर कोणासही भीक घालत नाही. 


बाकी गोकर्ण, सदाफुली, कण्हेरी, तगर, बिजली, शेवंती ही सगळी मध्यमवर्गीय मंडळी. रंग सुंदर, पण सुगंधहीन, low maintenance. माझा नंबर बहुधा यांच्या मधेच लागावा. वाटलंच होतं मला. बघा असं होतं गरज नसलेली प्रत्येक गोष्ट गरजेपेक्षा जास्त analyze केली की, जाऊ दे झालं.